धाराशिव (प्रतिनिधी)-मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि मागील अडीच वर्षांत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला मोठा विकास निधी मिळाला आहे. विकास निधीचा ओघ असाच सुरू ठेवण्यासाठी खासदार आणि सत्ताही महायुतीचीच आवश्यक आहे, असे मत शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणेगूर, सालेगाव, आष्टा कासार येथे प्रचारसभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, लोकसभेची निवडणूक कुठल्याही दोन पक्षांमधील निवडणूक नाही, तर देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. यामध्ये प्रत्येक मताला फार महत्त्व आहे. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे आहे. तेंव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणूनच येत्या निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन या निमित्ताने केली. यावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top