उमरगा (प्रतिनिधी)-मागील 2 दिवसांत उमरगा व लोहारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी म्हटले आहे की, उमरगा - लोहारा मतदारसंघात मागील 2 दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेक गावांत जिवीत व वित्त हानी झालेली आहे. मौजे व्हंताळ ता. उमरगा येथील शेतकरी कै. शिवाजी मोहीते हे शनिवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास शेतामध्ये असताना अंगावर विज पडुन त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. विशेषत: मौजे. कंडदोरा, सुपतगाव व कदेर आदी गावांमधील नागरिकांच्या घरावरील पत्रे व जनावरांचे शेड (गोठे) वादळामुळे उडुन गेल्याने अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत. अनेकांच्या शेतातील आंबा, साग इत्यादी झाडे उन्मळुन पडले आहेत. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी अशा सर्व नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत करणे गरजेचे आहे. उमरगा व लोहारा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 
Top