उमरगा (प्रतिनिधी) - उमरगा-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील खते व बी-बियाणे यांचा पुरवठा योग्य पद्धतीने व सुरळीत होण्याच्या मागणीचे निवेदन शुक्रवारी (24) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्याना देण्यात आले.

उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत वर्षी आपल्या भागात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेला आहे. मुबलक पाऊस न झाल्यामुळे उत्पनात घट झाली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.पाऊस कमीझाला असला तरी हा उमरगा तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात आलेला नसल्याने तालुक्यातील शेतकरी, दुहेरी संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांना चालु खरीप हंगामासाठी लागणारे खते व बि-बियाणांचे उमरगा-लोहारा तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र दुकानांत मुबलक अन माफक दरात योग्य पद्धतीने सुरळीतपणे पुरवठा होण्यासाठी तालुकास्तरावरती समिती स्थापन करण्यात यावी. तसेच गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पिककर्ज,कृषी चे विज बिल माफ करण्यात यावे. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने दोन्ही तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. या निवेदनावर शेतकरी जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे, तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, भगवान जाधव, रजाक अत्तार, डी. के. माने आदीसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top