मनमानी फिस, तज्ञ शिक्षक सोयी सुविधांचा अभाव !

समर व्हॅकेशनच्या नावाखाली पालक, मुलांची पिळवणूक!

तुळजापूर - तालुक्यात कोंचींग क्लासेसचा सुळसुळाट वाढला असून याचे  लोण  आता  ग्रामीण भागात पोहचले आहे. या कोचींग क्लासेस चालकांकडून चांगले गुण मिळवुन देणार अशी आश्वासने देत पालकांकडून भरमसाठ फिस घेत आहेत. त्यामुळे हे कोंचींग क्लासेस पालकांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहेत. 

संविधानात कलम ४५अन्वय ६ते १४वर्षचा मुलांना मोफत शिक्षण सक्तीचे असताना  शासनाने १६ वर्षाच्या मुलांना क्लासेसमध्ये बंदी असताना कायद्याला न जुमानता  क्लासेस चालक मनमानी पैसे घेऊन शिक्षण सर्रास देत आहेत. शिक्षण खात्यातील  संबंधित अधिकारी वर्गाचा यास मूक पाठींबा तर नाही ना? असा सवाल आता केला जात आहे. 

चांगली टक्केवारी, नोकरीची शाश्वती यासह अनेक आमिष दाखवून पालकांची मानसिकता क्लासेसमध्ये घालण्याची तयार करतात. या क्लासेसमध्ये शिकवणारा पदवी पास व  त्या विषयात तज्ञ असावा लागतो, पण याची तपासणीच होत नाही. मुले क्लासेसमध्ये यावीत म्हणून क्लासेसवाले शहरात होर्डींग लावून गुणवत्तापुर्ण उच्च शिक्षण सेवा, सुविधा, तज्ञांचे मार्गदर्शन म्हणून जाहिरातबाजी करतात. या क्लासेसची तपासणी कोण करते, याचा मागमूस लागत नाही. यावर आळा घालणे गरजेचे बनले आहे. सेवा सुविधा वसतिगृह शुल्क याची शासनाने तपासणी करणे गरजेचे आहे. ज्ञानमंदिराचे बाजारीकरण न होणे गरजेचे बनले आहे. आज क्लासेसचालक साने गुरुजींचे नाव घेऊन नाणे गुरुजी बनले आहे. या व्यवसायात प्रचंड आर्थिक मिळकत असल्याने क्लासेसचालक मालामाल व पालक मात्र कंगाल होत आहेत.

एखाद्या मुलाने चांगले गुण मिळवले, त्यात शाळा शिक्षकांचा वाटा असणारच. पण हे गुण आमच्या क्लासेसमुळे मिळाल्याची जाहिरात करुन शाळेतील शिक्षण ही बाब गौण केली जाते. व  एकच गुणवंत विद्यार्थी अनेक क्लासेसच्या जाहिरातीत झळकलेले पहावयास मिळते. नियमानुसार असा दावा करता येत नाही, पण शिक्षण  क्षेत्रातील सिस्टीम भ्रष्ट झाल्याने सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे. 


समर व्हॅकेशनच्या नावाखाली पालक, मुलांची पिळवणूक !

उन्हाळा सुट्टी म्हटले अभ्यास बंद, मामाच्या गावी जाणे, मनसोक्त बागडणे, पोहणे यासह अन्य खेळ शिकणे. यामुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढते, पण मुलांचा पालकांना मोठी स्वप्ने दाखवून क्लासेस चालकांनी समर व्हॅकेशनच्या नावाखाली मुलांच्या सुट्टीचा आनंद हिरावून घेतला आहे. यामुळे बौध्दिक वाढ होत असली तर शारीरिक ताण वाढीचे काय? हा प्रश्न निर्माण होतो आहे.


क्लासेसचा व्यवसाय ग्रामीण भागात फोफावतोय !

क्लासेस चालकांनी आपल्या शाखा ग्रामीण भागात उघडुन तिथेही शिक्षणाचा व्यवसाय सुरु केला आहे. आधीच दुष्काळामुळे उत्पन्न हाती न आल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकरी वर्गासाठी हे क्लासेसचे लोण आर्थिक गर्तेत घालणारे ठरले आहे. 


 
Top