धाराशिव  (प्रतिनिधी)- येत्या 7 मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान होईल यासाठी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या कोणत्याही मतदाराची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) प्रमोदकुमार उपाध्याय यांनी दिले. 

आज 5 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक मतदान तयारीचा आढावा घेताना उपाध्याय बोलत होते.यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवडणूक निरीक्षक (खर्च) प्रदीप डुंगडुंग, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकारी या सभेत सहभागी होते.

उपाध्याय म्हणाले, ज्या गावांसाठी आणि शहरी भागात प्रभागासाठी नियुक्त केलेले बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अनुक्रमांक व अल्फाबेटिकली मतदार याद्या उपलब्ध असाव्यात. मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना त्यांची नावे व अनुक्रमांक उपलब्ध करून देऊन मतदान करण्यासाठी मतदारांना सहकार्य करावे हे काम केंद्रस्तरीय अधिकारी चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना नाव शोधण्यास त्रास सहन करावा लागणार नाही, असे ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी मतदान केंद्र, आरोग्य सुविधा या विषयी माहिती दिली.  


 
Top