तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानमधील कर्मचारी भरतीमध्ये पुजाऱ्यांना पन्नास टक्के जागा भरतीत प्राधान्य देण्याची मागणी श्रीतुळजाभवानी  पुजारी मंडळाने श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष डॉ. सचिन ओंम्बासे, विश्वस्त तथा आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानमध्ये जाहिरातीद्वारे कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. मंदीर संस्थानला मोठ्या प्रमाणात धार्मिक विधीकर, तसेच भक्तांना सर्व सुविधा देण्याचे काम पुजारी बांधवा मार्फत केले जाते. त्यामुळेच मंदीर संस्थानला मोठ्या प्रमाणात देणग्या, सोने, चांदी हे भक्ताकडून मिळते. मंदीर संस्थानमार्फत होणाऱ्या कर्मचारी भरतीत स्थानिक पुजारी बांधवाना पन्नास टक्के जागा उपलब्ध करुन देण्यात यावेत. धार्मिक व्यवस्थापक हे भरताना तिन्ही मंडळाच्या सहमतीने निवड करण्यात यावी जेणे करुन श्री तुळजाभवानी मातेचे वर्षभर विविध धार्मिक विधी होत असतात. त्याची संपुर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यास असणे  आवश्यक आहे. सर्व धार्मिक विधी हे तिथी नुसार होतात. त्यामध्ये होणारे बदल याची माहीती धार्मिक व्यवस्थापकास असावी.

तसेच श्री तुळजाभवानी मंदिर हे 1909 मध्ये पुजारी बांधवांच्या आपसातील वादामुळे त्यावेळीच्या निजाम सरकारकडे देण्यात आले. त्यावेळी निजाम सरकारने “कवायत“ कायदा करुन पुजाऱ्यांचे हक्क, अधिकार, कवायत नुसार आजही आपण येथील कामकाज करीत आहोत. कवायतचे उलंघन केल्यास करावयाचे शिक्षा याची सर्व माहीती असणाराच धार्मिक व्यवस्थापक असावा. यासाठी तिन्ही मंडळाच्या वतीने विनंती आहे की, धार्मिक व्यवस्थापक हे पद भरताना पुजारी बांधवाना देण्यात यावे जेणे करुन धार्मिक विधी, मंदिर प्रशासन, पुजारी वाद-विवाद यावर माहिती असेल तर भविष्यात कोणतीही कायदेशीर बाब निर्माण होणार नाही. त्यामुळे धार्मिक व्यवस्थापक हे पद पुजारी बांधवासाठी राखिव ठेवण्यात यावे. तसचे पीआरओ हे पद नियुक्त करताना, सामाजिक भान असणारा, मराठी, हिंदी, अंग्रजी, ऊर्दु, कन्नड, तेलगु या भाषा अवगत असणारा व्यक्तीच नियुक्त करण्यात यावा. 


 
Top