धाराशिव (प्रतिनिधी) - खरीप 2023 मध्ये सुरुवातीला पावसातील खंड व नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. अवेळी पावसाने झालेल्या नुकसानी बाबत ऑनलाइन तक्रारी देण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत विहित मुदतीत जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 92 हजार शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीला दिल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केली असून तक्रार दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील विमा वितरित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. 

पावसातील खंडामुळे संभाव्य नुकसानीच्या 25% अग्रीम प्रमाणे रु. 253 कोटी यापूर्वीच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. खरीप हंगामात अवेळी पावसाने देखील सोयबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत ऑनलाईन तक्रारी देण्याचे आवाहन त्यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना केले होते. या अनुषंगाने नुकसानीच्या साधारणत: 1,92,000 ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. 

 या तक्रारींच्या अनुषंगाने नुकसान भरपाई रकमेचे वितरण सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारी दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील इतरांप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचे सूचित करण्यात आले आहे. 

दुष्काळी परिस्थितीत खरीप हंगामा ची पेरणी तोंडावर असताना पेरणी पूर्वी पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. यामुळे त्यांना मोठा आधार मिळत आहे. ठाकरे सरकारच्या काळातील खरीप 2020 व 2021 मधील उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 
Top