धाराशिव (प्रतिनिधी)-ज्या गोपीनाथ मुंडे यांनी शेटजी आणि भटजीचा पक्ष ग्रामीण भागापर्यंत नेला होता. त्या गोपिनाथ मुंडे यांचा भाजप पक्ष बॅनरवर कोठेही फोटो वापरत नाही. यापूर्वी आपण 2018 साली गोपिनाथ मुंडे यांचा फोंटा भाजप कार्यक्रमाच्या प्रत्येक बॅनरवर वापरण्याची मागणी केली होती. परंतु काही उपयोग झाला नाही. मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता तर धाराशिव जिल्ह्यात भाजप पक्ष प्रायव्हेट लिमिटेड झाला आहे अशी टिका भाजपमधून शिवसेनेत आलेले भगवान बांगर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

धाराशिव येथे 4 एप्रिल रोजी दुपारी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे भूम तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर, प्रल्हाद आडगळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भगवान बांगर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना विजयी करण्यासाठीच आपण भाजप सोडून शिवसेनेत दाखल झालो आहे. गेल्या 17 वर्षापासून आपण भाजपमध्ये काम करीत आहोत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जास्त असताना भाजपला उमेदवारी का मिळू शकत नाही? असा प्रश्न उपस्थित करून बांगर यांनी मुंडे यांच्या एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पक्षाचे खच्चीकरण होत आहे असेही बांगर यांनी सांगितले. 
Top