भूम (प्रतिनिधी) -शहरात पार्डी ते खर्डा या रस्त्याचे काम सुरु आहे. जसे काम सुरू झाले आहे तसे हेतुपुरस्कर नागरिकांना त्रास देण्याचे काम गुत्तेदाराकडून केले जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. येण्या-जाण्यासाठी रस्त्याची तात्काळ सुविधा करून द्यावी अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना बुधवार दि.3 रोजी देण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील नालीचे काम चालू आहे. त्यामुळे शहरातील काही भागात जोडणाऱ्या रस्त्यावर चढ उतार निर्माण झाले आहेत. त्याठिकाणी हे काम पूर्ण झाल्यानंतर तेथील नागरिकांना सिमेंटचा पक्का रस्ता करून देणे गरजेचे असतानाही या गुत्तेदाराने रस्ता केलेला नाही. त्यामुळे नागरिक, पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनधारक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्तावरील कुसुमनगर भागात  बँक ऑफ इंडिया, एल.आय.सी. कार्यालय, रत्नमाला इण्डेन गॅस एजन्सी कार्यालय, कुरियर कंपनी, श्रीराम फायनान्स ही कार्यालये आहेत. मात्र गेल्या महिन्याभरापासून हा रस्ता गुत्तेदाराच्या गलथान कारभारामुळे बंद आहे. नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यानेच गुत्तेदार नागरिकांना पायदळी तुडविण्याचे काम करत आहे. या भागातील नागरिकांना रात्री-अपरात्री दवाखान्यात जायचे असल्यास चारचाकी वाहन बाहेर घेऊन जाणे शक्य नसल्याने वाहन भाड्याने करून जावे लागत आहे. हा रस्ता तात्काळ पूर्ण करावा अशी मागणी स्वराज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या रस्त्याच्या लगतच उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता आहे. तो या ठेकेदाराने अधिकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी करून दिला आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र रस्ता नसल्याने बेहाल झाले आहेत. यावरून उपविभागीय अधिकारी यांनाही जनतेचे काही देणे घेणे नाही असे प्रकारावरून दिसून येत आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या अश्या वागण्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.


हे ठेकेदार अधिकाऱ्यांना व नागरिकांना वेगळी वागणूक देत आहे. या ठेकेदारावर बांधकाम विभागाने कडक कारवाई करावी. शहरात अनेक भागात अशे चढ उतार तयार झाले असून ज्या भागात अशी स्थिती आहे. त्या भागात पक्का सिमेंट रस्ता करून द्यावा. 

प्रा. सागर गायकवाड - रहिवाशी


 
Top