धाराशिव (प्रतिनिधी)- कवी विजय वडवेराव आयोजित  'भिडेवाडा बोलला' या आंतरराष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुणे येथे पार पडले. देश- विदेशातून तब्बल सहाशे च्या वर कविता या स्पर्धेमध्ये सहभागी होत्या. स्त्री शिक्षणाची बीजे ज्या ठिकाणी पेरली गेली त्या भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व सर्वांना माहिती व्हावे तसेच पुढील पिढ्यांपर्यंत हा इतिहास पोहचावा या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक,शाल, पुस्तक व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रथम क्रमांक डॉ. कविता मुरूमकर (सोलापूर), द्वितीय क्रमांक डॉ. वैशाली शेंडगे (सांगली) आणि तृतीय क्रमांक प्रा. माया मुळे (धाराशिव) यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ विजेत्यांमध्ये कवी प्रभाकर दुर्गे, स्नेहल पाटील, मीनाक्षी जगताप, मनीषा पाटील, अनुपमा नाईक, आनंद ढाले, धनश्री ठाकरे, आनंद भोसले, क्षमा सावंत, मनोज भारशंकर, डॉ. स्नेहल कुलकर्णी, प्रणाली मराठे, वंदना केंद्रे, पल्लवी उमरे, वृषल चव्हाण यांचा समावेश आहे. 

भिडेवाडा मुक्ती चळवळीत योगदान असणाऱ्या दादासाहेब सोनवणे व अहिल्याबाई कांबळे यांचा ही यावेळी सन्मान केला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, कवी म. भा. चव्हाण, भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागाचे संचालक एम. डी. कदम उस्थित होते. स्नेहल पोटे व सूरत गुजरात यांनी सूत्रसंचालन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये तृतीय पुरस्कार मिळाल्यामुळे माया मुळे यांचे धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top