भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील ईट येथील जागृत ग्रामदैवत श्री खोपेश्वर यात्रेस शुक्रवार दिनांक 19 पासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या या यात्रेस हजारो भाविक हजेरी लावत असतात यात्रेची लगभग तशी अर्धा दिवसाची सुरू होते. यामध्ये परभणी लातूर मुरुड या ठिकाना वरून विविध प्रकारचे पाळणे, लहान मुलांसाठी करमणुकीचे खेळ आलेले ईटच्या यात्रा म्हणजे लहानापासून थोरापर्यंत व वृद्धापर्यंत सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय असतो.
यात्रेच्या कार्यक्रमाची रूपरेषा पाडव्या दिवशी संध्याकाळी पालखीच्या ओठ्यावर ठरवली जाते ग्रामपंचायत यात्रा कमिटी ग्रामस्थ हे या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असतात. पाडवा झाल्यानंतर दहा दिवसांनी म्हणजेच चैत्र कामदा एकादशी दिवशी यात्रेचा पहिला छबिना असतो. पहिल्या छबिन्याला रात्री बारा वाजता श्री.शंभू महादेवाची या पालखीतून मिरवणूक काढतात ही मिरवणूक रात्रभर चालते. या पालखीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 तारखेला भाविकांनी श्री खोपेश्वर चरणी बोललेले नवस पेढा,साखर,नारळ,गुळ वाटून फेडले जातात यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या छबिण्याला गावभर वाजत- गाजत शिरणी वाटप केली जाते. या दिवशी गावातील स्त्रियांनी उपवास ठेवलेले असतात. तर पहिल्या छबिन्या पासूनच पालखी जाणाऱ्या रस्त्यावर शेणाचा सडा मारून आकर्षक अशी रांगोळी काढलेली असते. आकर्षक अशा फुलांनी सजलेल्या 'श्री' च्या पालखी बरोबर बारामती, करमाळा, पाटोदा, ईटया ठिकाणच्या नवाजलेल्या बँड पथकांची स्पर्धा लावलेली असते. या स्पर्धेमध्ये जो बँड पथक पहिला, दुसरा,तिसरा येईल त्याला यात्रा कमिटी तर्फे बक्षीस देण्यात येते. या दिवशीच रात्री सोंगाच्या गाड्या काढत असतात यामध्ये गावातील तरुण-वृद्ध विविध प्रकारचे सोंग घेऊन अभिनय करीत असतात. देखावे करीत असतात. यांचे ही अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा असा क्रमांक स्पर्धेद्वारा काढण्यात येतो. नंतर पहाटे चार वाजता शोभेची दारू उडवली जाते. ही आतिषबाजी पाहण्यासाठी महिलांसह लहान मुलेही मोठ्या प्रमाणात येत असतात. तर यात्रेच्या तिसऱ्या छबिनेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी यात्रा कमिटीतर्फे दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांचा फड भरण्यात येतो. यामध्ये पंचक्रोशीसह पर जिल्ह्यातील मल्ल सहभागी होतात. ईटच्या यात्रेत येणाऱ्या प्रत्येक मल्लाला यात्रा कमिटीतर्फे बक्षीस देण्यात येते. ईटच्या श्री खोपेश्वर यात्रेला कामानिमित्त बाहेर गावी असलेले ईटचे नागरिक सरसकट उपस्थित असतात या यात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.