भूम (प्रतिनिधी)-शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांसाठी कृषि निविष्ठा येतात. मात्र त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही. त्यांचा त्रास कृषी सहाय्यकांना होता. त्यामुळे त्याची अंमलबजावणी नियमाप्रमाणे राबवावी. त्याचे थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेच्या माध्यमातून करावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून भूमचे तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांना मंगळवार दि.16 रोजी देण्यात आले.  

शासन  धोरणानुसार कृषी  विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत बियाणे, किटकनाशके व इतर कृषि निविष्ठांचे वाटप अनुदान तत्वावर करण्यात येते. ते सद्य परिस्थितीत निविष्ठा वाटप हे कृषि सहाय्यकामार्फत केले जाते . त्यामुळे निविष्ठा वाटप करताना कृषि सहाय्यकांना विविध अडचनींना सामोरे जावे लागते.  निविष्ठा ठेवण्याकरिता ग्रामस्तरावर गोडाऊन उपलब्ध नाहीत.  निविष्ठा वाहतुकीचा खर्च कृषि सहाय्यकांना  उचलावा लागतो. या निविष्ठा मुळातच उशिरा येतात त्यामुळे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायच्या कश्या हा मोठा प्रश्न कृषी सहाय्यकांसमोर उभा राहतो. काही अडचणी आल्या तर त्याची जबाबदारी ही त्या कृषी सहाय्य्यकांची मानली जाते. त्यामुळे अशा अडचणी टाळण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT)  प्रणाली योजना राबविणे अत्यंत सोईचे आहे. खरीप हंगाम 2024 पासुन निवड होणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना खुल्या बाजारातुन निविष्ठा खरेदी करता याव्यात यासाठी उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे अनुदान रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT)  पध्दतीने वितरीत करावी. डीबीटी पध्दतीने रक्कम मिळाल्यामुळे आवश्यक त्या निविष्ठांची उपलब्धता वेळेत होईल. तसेच सर्व योजना पारदर्शक व सुलभपने राबवल्या जातील. तसेच ग्रामस्तरावर बियाणे, किटकनाशके व इतर कृषि निविष्ठा वाटपासाठी येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. व पेरणीच्या वेळी पिक उत्पादन वाढीची सुत्रे व तंत्रज्ञान शेतकऱ्यांकडुन करुन घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देता येईल. अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका भूम जिल्हा धाराशिव यांच्यावतीने तालुका कृषी अधिकारी भूम यांना कृषी निविष्ठा संदर्भात थेट लाभ हस्तांतरण योजना राबवावी यासाठी तालुका कृषी अधिकारी याना निवेदन देण्यात आले  आहे. यावेळी कृषी पर्यवेक्षक  कैलास चोरमले व कृषी पर्यवेक्षक मिथुन वाणी, अण्णासाहेब खटाळ, सचिन थळकरी, आकाश पठारे, श्रीमती आर आर शिंदे, अनिता धनेदर, स्वाती राऊत यांच्यासह कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक हजर होते.


 
Top