धाराशिव (प्रतिनिधी)-उमरगा आणि लोहारा तालुक्यातील जनता सतत शिवसेना म्हणजेच महायुतीच्या पाठीशी आहे. लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यावेळी पूर्वीच्या उमेदवारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी व्यक्त केला.

उमरगा तालुक्यातील कदेर, कसगी, बेडगा, डिग्गी, तुरोरी सह अन्य गावांत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या समवेत माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह महायुतीतील पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कर्तृत्वामुळे पाटील कुटुंबीयांवर निस्वार्थ आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अजूनही मोठी आहे. बेडगा, डिग्गी आणि कदेर येथील शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी एकत्रितरित्या प्रचारकार्य जोमाने करीत आहेत. त्यामुळे सर्व वाड्या, वस्तींवर, तांड्यावरून अर्चनाताई पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल आणि यापूर्वीच्या उमेदवारापेक्षा अधिक मताधिक्य यावेळी मिळणार असल्याचा विश्वास प्रा. रवींद्र गायकवाड यांनी व्यक्त केला.


 
Top