तुळजापूर (प्रतिनिधी)-   धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार  निश्चित होवुन ते प्रचाराला लागले आहेत. माञ  कधी नव्हे इतके तापमान जिल्हयात वाढल्याने याचा परिणाम प्रचार यंञणेवर झाला आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच 40 अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर दिसू लागला आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दुपारी बारापूर्वी आणि सायंकाळी चार नंतर असे प्रचाराचे नियोजन केल्याचे दिसते. दुपारचे चार तास प्रचाराला सुट्टी दिल्यासारखी स्थिती दिसते.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. पण एप्रिल महिन्यात मे महिन्याचे तापमान निर्माण झाल्याने व ते दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे दुपारची प्रचार यंञणा कोलमडली आहे. मतदार ही दुपारी प्रचारासाठी दारात आला कि तुम्हालाच करतो म्हणून लगेच निघुन जात आहे. आता एप्रिलच्या सुरुवातीला दुपारचे बाहेर पडणे मुश्कील होईल, असा उष्मा वाढला आहे. त्यामुळे दुपारी रस्ते सामसूम होतात. ही परिस्थिती ग्रामीण भागातही तशीच आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणांनी दुपारचे नियोजन थांबवल्याचे दिसते. सकाळी 7 वाजता प्रचाराला सुरुवात होत असल्याचे चित्र आहे. दुपारी 12 पूर्वी पहिला टप्पा प्रचार यंत्रणांचा पूर्ण केला जातो. त्यानंतर दुपारी चारनंतर प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू होतो. मग रात्री दहापर्यंत प्रचार जोरात सुरू असल्याचे दिसते. दुपारी बारा ते चारपर्यंत प्रचार थंडावल्याचे सध्या दिसत आहे. उन्हाचा तडाखा वाढत राहणार असल्याचा अंदाज हवामान संस्थांनी नुकताच व्यक्त केला आहे. याचा अर्थ या काळात प्रचार करण्याचे जाणीवपूर्वक टाळले जाईल. यापूर्वी सकाळी आणि दुपारी जाहीर सभा होत होत्या. सध्या या सभा होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. लाऊडस्पिकरद्वारे दुपारचा प्रचार पदयात्रा, जाहीर सभा, घरोघरी संपर्क या प्रचार तंत्राला दुपारी उष्म्यामुळे मर्यादा येत आहेत. यावर उपाय म्हणून उमेदवारांच्या प्रचार यंत्रणांनी नामी शक्कल लढवली आहे. दुपारचे चार-पाच तास वाया जाऊ नयेत, यासाठी रिक्षा, जीपच्यामाध्यमातून लाऊड स्पिकरद्वारे मतदारांना आवाहन केले जात आहे.


 
Top