धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्लीत गवळी समाजाच्यावतीने शतकानुशतकापासून चालत आलेल्या परंपरेनुसार नवीन वर्षाच्या  व गुढीपाडव्याच्या निमित्ताने म्हशी व रेडे पळविण्याचा कार्यक्रम अत्यंत आनंदीमय, उत्साही व प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.  

धाराशिव नगरीतील व जवळपासच्या ग्रामीण भागातून म्हशी पळवणे व गुराखी व पशुपालकांचा उत्साह अत्यंत दांंडगा आनंदी वातावरणातून दिसून आला. म्हशी व रेडे पळविण्यासाठी विविध प्रकारचे रंग देऊन व आपल्या जनावराच्या पाठीवर अनेक प्रकारच्या नामउल्लेखाने व हाकेच्या, घोंगडी, मोरपीसाच्या मुरकुज्याच्या इशारावर, व मोटार सायकलीच्या आवाजावर पळविणे, ही कला दाखवण्याची ईर्षा पशुपालक दाखवीत होते. यावेळी कारभारी काशिनाथ दिवटे व भीमाशंकर दहीहंडे यांच्यासमोर म्हैस व रेडा आणून सलाम केला जात असे.  पशुपालकांना टिळा, पानसुपारी  व साखरेचा हार देऊन सन्मान केला जात होता.  म्हशी व रेडे पळविण्यामध्ये कुराडे, सुरवसे, कदम, शेख, काझी, शेरकर, पवार, काळे, खेलगवळी, मिसाळ, केदार उपाध्ये, रायबान, तुळजापूरहून मलकूनाई इत्यादी म्हशी, रेडे व लहान वासर पळवून एक स्वतःची कला घोंगडी व मुरकुजा इशाऱ्यावर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अनेक पशुपालकांनी फटाक्यांच्या व हलगीच्या वाद्यावर जोश पूर्ण म्हशी पळवून दाखविले. कार्यक्रमास प्रा. गजानन गवळी, राजकुमार दिवटे, नंदकुमार हुच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज अंजीखाणे, श्रीकांत दिवटे, कल्याण गवळी, वैभव अंजीखाने, विश्वास दळवी, वरून साळुंखे ,मुझेमिल पठाण इत्यादीने परिश्रम घेऊन यशस्वी केले.  कार्यक्रम पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पशुप्रेमी लहान, थोर या सर्वांनी गर्दी केली होती.   कार्यक्रमासाठी सोलापूर, तुळजापूर जालना व धाराशिव शहराच्या लगत असणाऱ्या ग्रामीण भागातील पशुपालकांनी गर्दी केलेली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन व नियोजनामध्ये प्रा. भालचंद्र हुच्चे यांचा समावेश होता.


 
Top