धाराशिव (प्रतिनिधी)-खासदार ड्रामेबाज आहे. त्याचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. तेरणा बंद पाडून सगळे भंगार विकले आणि त्याचे खापर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर फोडत सुटला आहे. आता या ड्रामेगिरीला कडवट शिवसैनिक फसणार नाही. 24 तासात यंत्रणा कामाला लावा, जीवाचे रान करू, पण यंदा घड्याळ दोन लाख मताधिक्याने निवडून आणू, अशा शब्दात पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, सुरज साळुंके आदींची यावेळी उपस्थिती होती.

शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही, याची खंत आपण जाहीर कार्यक्रमातून व्यक्त केली. याचा अर्थ आपला महायुतीला विरोध आहे असा नाही. शिवसैनिक हेच सर्वात मोठे पद आहे. चमचेगिरी करण्याची आपल्याला सवय नाही. जे आहे, ते सडेतोड बोलतो. 

याप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसैनिकांची अस्मिता कुठेही दुखावणार नाही. याबाबत आपण जागरूक असल्याचे सांगत मोदींच्या विजयासाठी एकत्रित काम करू आणि त्यानंतरच नेतेमंडळींना विश्वासात घेवून आणि जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित काम करू, असे नमुद केले. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपला उमेदवार अधिक मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनीही शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रत्येक घरी जावून विजय करण्याचे आवाहन करावे, असे सांगितले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही यावेळी महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास ढोकी येथील तेरणा साखर कारखान्यावर शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी सुरेश देशमुख, सुधीर पाटील, बिभीषण खामकर, अजित खोत, संजय गाढवे, बाळासाहेब पाटील हंडोग्रीकर,शिवसेनेचे जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top