धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूकविषयक कामे पूर्ण करण्यासाठी विविध कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूकीची सर्व कामे संबंधित कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक करावी. असे निर्देश निवडणूक निरिक्षक (सामान्य) प्रमोदकुमार उपाध्याय यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत उपाध्याय बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, निवडणूक निरिक्षक (खर्च) प्रदीप डुंगडुंग, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, नोडल अधिकारी जाधव, भोर,भोसले,पांडे, खडसे, रूकमे, बारगजे यांच्यासह अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपाध्याय म्हणाले, कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या तपासणी नाक्यावर संबंधित पथकाने दक्ष राहून काम करावे. वाहनांची बारकाईने तपासणी करावी.कोणत्याही वाहनातून रोख रक्कम आणि दारूची वाहतूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे. रोख रककम व दारू आढळून आल्यास तात्काळ कारवाई करावी. असे ते म्हणाले.

यावेळी डुंगडुंग म्हणाले, उमेदवाराच्या दररोज होणाऱ्या खर्चाकडे लक्ष असावे. त्यांच्या नियमित खर्चाची तपासणी करण्यात यावी. रॅली, सभा व प्रचारात असलेल्या वाहनांचे चित्रीकरण करण्यात यावे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.ओंम्बासे म्हणाले, तपासणी नाक्यावर बॅरीकेट्सची आवश्यकता असल्यास मागणी  करावी. रोख रक्कम आणि दारूची वाहतूक होत असल्यास पथकांनी ती पकडून त्यावर कारवाई करावी. दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने ज्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत असे अधिकारी व कर्मचारी आढावा सभेत सहभागी होते. 
Top