धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील विश्व शक्ति पार्टीचे उमेदवार नवनाथ दुधाळ यांनी सोमवारी (दि.15) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी शहरातून धाराशिव शहरातून भव्य रॅली काढली. देशातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध 50 संघटनांनी एकत्र येऊन विश्व शक्ति पार्टीची स्थापना केली असून या पक्षाने महाराष्ट्रातून श्री.दुधाळ यांची पहिली उमेदवारी जाहीर केलेली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना अभिवादन करुन रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. रॅलीमध्ये घोडागाडी आणि शेणाचा लेप दिलेल्या कारने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

कर्जमुक्त धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा नारा घेऊन गोसेवक दुधाळ हे निवडणुकीत उतरले आहेत. त्याचबरोबर स्व. राजीव दीक्षित यांना भारतरत्न देण्यात यावा, गोवंश संवर्धन करण्यासाठी दरमहा तीन हजार रुपये  मानधन देण्यात यावे तसेच गोमातेसाठी स्वतंत्र  मंत्रालय असावे, ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे,  शेतकऱ्यांना शेतीसाठी 12 महिने 24 तास मोफत वीज पुरवठा, रसायनमुक्त व  विषमुक्त शेती,  पेट्रोल डिझेल आणि जीवनावश्यक वस्तू करमुक्त करण्यासाठी आपण निवडणुकीत उतरलेलो असल्याचे विश्व शक्ति पार्टीचे उमेदवार श्री.दुधाळ यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. यावेळी यावेळी विश्व शक्ति पार्टीचे  राष्ट्रीय महासचिव डॉ.अभय छेडा, स्वदेशी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर मदन दुबे, दत्तात्रय क्षिरसागर, यांच्यासह दुधाळवाडी, अवधूतवाडी, गौर, रत्नापूर, येरमाळा, दहिफळ  व जिल्ह्यातील गोसेवक उपस्थित होते.


 
Top