धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.मनोज डोलारे यांना पक्षीसंवर्धनातील योगदानाबद्दल जागतिक स्तरावर अनेक देशात कार्यरत असलेल्या गांधी पीस फाऊंडेशन नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट देवून सन्मानित करण्यात आले. 

पुणे येथील ग.दि.माडगूळकर सभागृहात 6वा ग्लोबल मानद डॉक्टरेट पदवीदान व पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. गांधी पीस फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.लालबहादूर राणा, पुण्यातील जेष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देवून गौरविण्यात आले. यावेळी पद्मश्री विजयकुमार शहा, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.आशा पाटील, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.डॉ.मंगेश नेने, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे, गांधी पीस फाऊंडेशनचे भारत प्रभारी डॉ.सुनिलसिंह परदेशी, डॉ.नरेंद्र भुषणसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.मनोज डोलारे हे श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहेत. ते मागील 15 वर्षांपासून पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात काम करत आहेत. ते वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य, बी.एन.एच.एस.चे जिल्हा समन्वयक अशा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील विविध पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पक्षी संवर्धनातील त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे.

पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक तसेच वन्यजीव छायाचित्रकार म्हणून ते जनमानसात परिचित आहेत.

त्यांनी सन 2006 पासून निसर्ग भ्रमंती, पक्षी निरीक्षण, वन्यजीवांचा अभ्यास सुरु केला. जनमाणसांना रानफुले, फुलपाखरे, पक्षी, वन्यजीव, वनस्पती यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून निसर्गाच्या जवळ नेण्यासाठी नेचर वॉक, ट्रेकिंग, अभ्यास भ्रमंती यांचे आयोजन ते सतत करतात. मागील आठ वर्षापासून धाराशिव जिल्ह्यात पक्ष्यांसाठी 15000 हून अधिक कृत्रिम घरट्यांचे मोफत वाटप त्यांनी केले आहे. 'दाना-पाणी' उपक्रमांतर्गत शेकडो ठिकाणी पक्षांसाठी मुठभर धान्य आणि ओंजळभर पाण्याची सोय त्यांनी केली. अनेक वन्यजीवांवर प्रथम उपचार करून त्यांची सुटका केली. धाराशिव जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पक्षांसाठी कृत्रिम घरटे बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना घरटी बनवण्याचे प्रशिक्षण ते देत आहेत. सहकारी तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करुन त्यांची जोपासना प्रा.डोलारे हे करत आहेत.

महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन, जर्नल्स तसेच अनेक वृत्तपत्रात त्यांचे पर्यावरण, वन्यजीवांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत. राज्यस्तरीय वाईल्डलाइफ फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम पारितोषिक देखील त्यांनी पटकावले आहे. निसर्ग तसेच वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन भरून विद्यार्थी व जनमानसात निसर्ग वन्यजीवाबाबत जागृती ते करत आहेत. पक्षीसंवर्धनातील या सर्व कार्याची दखल गांधी पीस फाऊंडेशनने घेऊन प्रा.डोलारे यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानीत करण्यात आले. प्रा.मनोज डोलारे यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 
Top