धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची धाकटी बहिण म्हणून ओळख असलेल्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पालखी दर्शन घेवून देवीचरणी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी साकडे घातले. यात्रेत आलेल्या अनेक यात्रेकरू, भाविकांशी आमदार पाटील यांनी संवाद साधला.

बुधवारी येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेस मंगळवारी प्रारंभ झाला. बुधवारी यात्रेचा दुसरा दिवस होता. येडाईच्या डोंगरावरून देवीच्या पालखीची वाजतगाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. पालखी चुनखडीच्या रानात आल्यानंतर लाखो भाविकांनी चुना वेचून पालखीवर टाकत मनोभावे देवीचे दर्शन घेतले. यावेळी लाखो भाविकांनी पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या, सडा, रांगोळी रेखाटल्या होत्या. पालखी चुन्याच्या रानातून पुढे आमराईत विश्रांतीसाठी थांबल्यानंतर राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

दरम्यान भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बुधवारी देवीच्या पालखी मिरवणुकीत सहभाग घेत पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीकडे महायुतीच्या विजयासाठी साकडे घातले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, मनोगत शिनगारे यांच्यासह महायुतीचे स्थानिक विकास बारकुल,गणेश बारकुल,मदन बारकुल,महेश बारकुल,तानाजी सवणे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top