धाराशिव (प्रतिनिधी)- मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रविकास गतिमानतेने केला आहे. लोकहिताच्या असंख्य योजनांचा लाभ प्रत्येक गावात पोहोचला आहे, त्यामुळे पुन्हा देशात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येण्यासाठी महायुतीला मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन युवा नेते मल्हार पाटील यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील केशेगाव, पाटोदा येथे उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. मागील 10 वर्षांमध्ये मोदी सरकारच्या काळात राष्ट्राच्या विकासाची गती अत्यंत वाढली आहे. लोकहिताच्या असंख्य योजनांचा लाभ प्रत्येक गावात पोहोचला आहे. धाराशिवच्या विकासासाठी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अनेक मोठे प्रकल्प आणले आहेत. त्याचा फायदा खेडोपाडी, ग्रामीण भागातही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे. विकासाचा हा ओघ कायम राहावा व आपल्या गावातही भरघोस विकास निधी आणता यावा, यासाठी खासदार आपल्या हक्काचा असणे आवश्यक आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहे. मतदारांनी चिन्ह लक्षात ठेवून मतदान करावे, असे आवाहनही युवा नेते मल्हार पाटील यांनी यावेळी केले. यावेळी केशेगाव व पाटोदा गावातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top