धाराशिव (प्रतिनिधी)- कसबे तडवळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक तयार करून या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने स्किल डेव्हलपमेंटसारखे शैक्षणिक केंद्र उभारण्याचा संकल्प आपण केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी आपण कटिबध्द आहे, असा शब्द भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला.

तालुक्यातील कसबे तडवळे येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गौतम बुध्दांच्या मूर्तीस अभिवादन करून सभागृहात ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, येथील रेल्वे स्टेशनच्या विकास कार्यातून कसबे तडवळ्याची ओळख केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देश पातळीवर निर्माण करण्याकरिता आपण प्रयत्नशील आहोत. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्किल डेव्हलपमेंट सारखे शैक्षणिक केंद्र या ठिकाणी उभे राहावे, असा आपला मानस आहे. पुढील काळात त्यासाठी आपण निश्चितच मोठे प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन आमदार पाटील यांनी यावेळी दिले. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कसबे तडवळे येथील सर्व ग्रामस्थ मंडळी अर्चनाताई पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना प्रचंड मताधिक्य मिळणार, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.


 
Top