धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीमध्ये  सुरेश बिराजदार व आमदार विक्रम काळे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी न मागण्यासाठी विधान परिषदेचे आश्वासन दिले आहे. त्याप्रमाणे आपल्याला मंत्रीपदाचे आश्वासन दिले आहे का? असा प्रश्न आमदार विक्रम काळे यांना पत्रकारांनी विचारला असता आपल्या मंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतली. असे मत आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 15 हजार तरूणांना रोजगार देण्यासाठी एखादा प्रकल्प आणूनच पुढच्या वेळी मत मागायला येईन, असे वचन दिले होते. या संदर्भात माहिती देण्यासाठी आमदार काळे यांनी पत्रकार परिषदे बोलविली होती. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, नंदकुमार गव्हारे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील एक मंत्रीपद शिल्लक आहे. याबाबत आपण चार वेळेस मराठवाडा शिक्षक संघातून आमदार झालो आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी साहजिकच इच्छुक आहे. परंतु मंत्रीपद देण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही काळे यांनी सांगितले. 


सावंतांच्या बाबतीतील शंका दूर

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून सावंत बंधूंसह शिवसैनिकांना खंत होती. परंतु ढोकी येथे महायुतीतील प्रमुख नेतेमंडळींच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या बाबतीतील शंका दूर झाली आहे. सावंत बंधू उशिरा जरी प्रचाराला आले असले तरी आपले सर्व शिवसैनिकांना महायुतीच्या विजयासाठी कामाला लागण्याचे जाहीर आवाहन केले आहे. त्यामुळे आता महायुतीचा विजय ही केवळ औपचारिका राहील, असे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.


 
Top