धाराशिव (प्रतिनिधी)- पत्रकार रवींद्र केसकर यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या 7 दिवसात प्रकारणाचा पोलिसांनी छडा लावला. पाचपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी हा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे असून, आठ वर्षांपूर्वी केलेल्या बातमीचा राग मनात धरून सोमवार 1 एप्रिल रोजी मित्राच्या मदतीने त्याने पत्रकार केसकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवार 1 एप्रिल रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास पत्रकार केसकर कार्यालयातील काम आटोपून घरी जात होते. शहरातील बेंबळी रस्त्यावर त्यांची गाडी अडवून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच प्रतिकार केल्यानंतर मारहाण करून दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पत्रकार संघाच्या वतीने पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन देऊन आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या धडाकेबाज मोहिमेनंतर पोलिसांनी अवघ्या सात दिवसात आरोपीचा शोध लावला असून, यातील प्रमुख आरोपी हा शहरातील शाहू नगर येथील प्रेमकुमार सुखदेव बनसोडे असून, त्याने चार मित्रांच्या मदतीने हा प्रकार केला.


 
Top