धाराशिव (प्रतिनिधी)-  कारवाई न करण्यासाठी 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून फोन पे द्वारे पाच हजार रूपयांची लाच घेणारा तुळजापूर येथील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. 6 मार्च रोजी तुळजापूर येथून ताब्यात घेतले.

एका क्रेन चालकाकडून हंगरगा येथील महावितरणचे तीन इलेक्ट्रिक खांब व वायर तुटून नुकसान झाले होते. याबाबत तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळी तुटलेली लाईन जोडून दिली म्हणून तुळजापूर शहर महावितरण शाखेच वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन किसन शितापे (वय 40) व हंगरगा (तुळ) येथील खासगी व्यक्ती किशोर हंगरगेकर यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी तडजोडीअंती पाच हजार रूपयांची लाच स्विकारण्याच मान्य केले. त्यानंतर खासगी व्यक्तीने फोनपे द्वारे पाच हजार रूपयांची लाच स्विकारली. यानंतर पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी एसीबीचे पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम आणि पोलीस अमलदार सचिन शेवाळे, सिध्देश्वर तावसकर यांच्या पथकाने केली आहे. 
Top