तुळजापूर (प्रतिनिधी)-संत तुकाराम महाराज यांचे वंशज वै. श्रीगुरू सोपानकाका महाराज देहूकर, वै. श्रीगुरू माऊली महाराज देहूकर यांच्या कृपाआशीर्वादाने आणि श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर, श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. दरम्यान, यंदाचे वर्षे सप्ताहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने राज्यातील विविध ठिकाणच्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा, प्रवचनसेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

हा अखंड हरिनाम सप्ताह चैत्र शुद्ध 1 गुढी पाडव्याच्या मुहूर्तापासून (9 ते 16 एप्रिल) राहणार आहे. या सप्ताहाच्या दैनंदिन कार्यक्रमात पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 10 गाथा पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचनसेवा, संध्याकाळी 8 ते 10 संकीर्तन आणि रात्रौ हरिजागर असे अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या सप्ताहात राज्यातील नामांकित किर्तनकार जगत्गुरू संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर, श्रीगुरू बाळासाहेब महाराज देहूकर, श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर, श्रीक्षेत्र पंढरपूर, हभप उमेश महाराज दशरथे मानवत, हभप पांडुरंग महाराज घुले देहू, हभप चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर, हभप एकनाथ महाराज सदगिर ठाणे, हभप आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर नाशिक यांची संकीर्तन सेवा होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह काळात सर्व भाविक भक्तांना सकाळचा नाष्टा, दुपारचे व संध्याकाळच्या महाप्रसादाची (पंगतीची) व्यवस्था गावातील अन्नदात्यांनी सामुदायिक केलेली आहे.त्यासाठी भोजन समिती, येणाऱ्या वारक-यांची निवास व्यवस्था समिती, पाणी पुरवठा समिती, नियोजन समिती, गाथा पारायण समिती, संकीर्तन सेवा समिती, प्रसिद्धी विभाग समिती, मान्यवर आदरतिथ्य समिती, वर्गणी संकलन समिती अशा विविध समित्यांच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले आहे. या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व श्री विष्णू महादेव यात्रा सोहळा श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. तरी या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व श्री विष्णू-महादेव यात्रेमध्ये तामलवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन तामलवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top