धाराशिव (प्रतिनिधी) -सत्तेच्या परिवर्तनासठी नव्हे तर व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे विश्व शक्ति पार्टीचे उमेदवार नवनाथ विश्वनाथ  दुधाळ यांनी सांगितले.

दुधाळवाडी येथील गोशाळेत रविवारी (दि 7) झालेल्या पत्रकार परिषदेत  दुधाळ यांची उमेदवारी घोषीत करण्यात आली. यावेळी विश्व शक्ति पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तरुण कोठारी व राष्ट्रीय महासचिव डॉ. अभय छेडा, स्वदेशी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर मदन  दुबे, शैलेंद्र नावडे, गहिनीनाथ रितोंड, मंगेश मोरे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्री. दुधाळ म्हणाले की,, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील क्रांतिकारी चळवळीत कार्यरत असलेल्या विविध 50 संघटनानी एकत्र येऊन विश्व शक्ति पार्टीची स्थापना केली आहे. आपण स्वतः स्वदेशी जनता सरकार मोर्चाच्या माध्यमातून कर्जमुक्ती अभियान देशभरात राबविले आहे.  देशातील मोठ्या उद्योगपतींचे 68 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, त्याप्रमाणेच शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना कर्जमुक्त करण्यासाठी, स्वदेशी अभियानाच्या माध्यमातून गोवंशाचे रक्षण करण्यासाठी काम करत आहोत. या सर्व चळवळीतील कार्यकर्ते आपल्या सोबत घेऊन आपण उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीत स्व. राजीव दीक्षित यांना भारतरत्न देण्यात यावा, गोवंश संवर्धन करण्यासाठी दरमहा तीन हजार रुपये  मानधन देण्यात यावे तसेच गोमातेसाठी स्वतंत्र  मंत्रालय असावे, ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे,  शेतकऱ्यांना शेतीसाठी 12 महिने 24 तास मोफत वीज पुरवठा, रसायनमुक्त व  विषमुक्त शेती,  पेट्रोल डिझेल आणि जीवनावश्यक वस्तू करमुक्त करण्यासाठी आपण निवडणुकीत उतरलो आहोत. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नसून राजकारणातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी ही निवडणूक लढवीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित पदाधािऱ्यांनीही पार्टीची भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी घोषीत झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धाराशिवसह मराठवाड्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 
Top