धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे.त्यामुळे उन्हाचा तडाखा देखील वाढत आहे. जिल्ह्यात वाढते तापमान व पुढील महिन्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची दृश्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली.यामध्ये उष्माघाताच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व आरोग्य संस्थांनी नागरिकांना योग्य उपचार व उष्माघाताबाबत काळजी घेण्याबाबतचे आरोग्य शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्ह्यात 5 ग्रामीण रुग्णालये, 6 उपजिल्हा रुग्णालये,44 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 2 शहरी आरोग्य केंद्र येथे कोल्ड रूम स्थापन करण्यात आलेल्या आहेत.उष्माघाताच्या उपचारासाठी मुबलक औषधी साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. जिल्हयात उष्माघाताबाबत उपाय योजनेसाठी टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे. सर्व आरोग्य संस्थांना प्रसिद्ध साहित्य देखील देण्यात आले आहे.

नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर टोपी, रुमाल व छत्रीचा वापर करणे,हलक्या रंगाचे, पातळ सुती कपडे वापरणे,लहान मुले व गरोदर माता वृद्ध यांचे विशेष काळजी घेणे घ्यावी. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत घराभार जाणे टाळावे.असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिदास व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुल्ला यांनी नागरिकांना केले आहे.


 
Top