भूम (प्रतिनिधी)-भूम तालुक्यातील चिंचोली येथील नितीन जगन्नाथ औंढकर यांचे अपघाती दुःखद निधन झाले . ही घटना शुक्रवार दि 29 रोजी साडेतीन  वाजण्याच्या सुमारास घडली . ते धाराशिव तालुक्यातील येडशी येथील महावितरण कार्यालयात  वरिष्ठ यंत्र चालक पदावर कार्यरत होते . या घटनेने चिंचोली गावात शोककळा पसरली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की , नितीन औंढकर  हे कार्यालयातील कामकाज आटोपून भूम तालुक्यातील चिंचोली या आपल्या गावाकडे येत होते . ते तेरखड्यातून नांदगाव मार्गे भूम कडे येत होते . ते महामार्गापासून नांदगाव कडे दोन कि मी अंतरावर आले होते . या दरम्यान त्यांच्या मोटारसायकल क्र एम एच 25 डब्लू 4122 ला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली . यात नितीन हे गंभीर जखमी झाले . या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना फोन च्या माध्यमातून मिळाली . नातेवाईक घटनास्थळी जाईपर्यंत त्यांना खाजगी वाहनाने बार्शी येथे उपचारासाठी नेण्यात आले होते . उपचारादरम्यान त्यांची रात्री साडे अकरा वाजता प्राणज्योत मालवली . या घटनेने चिंचोली व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. त्यावर चिंचोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 
Top