भूम (प्रतिनिधी)-टँकर तसेच अधिग्रहणाचे प्रस्ताव 7 दिवसांत मंजूर करा. जे अधिकारी व कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील त्यांची गय केली जाणार नाही. पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आदेश दिले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार जयंत पाटील, गटविकास अधिकारी संतोष नागटीळक, नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्यासह पाणीटंचाई संबंधित अधिकारी कर्मचारी हजर होते. भूम येथील तहसील कार्यालयात बुधवार दि 3 रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी भूम तालुका पाणी टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तालुक्याची पाण्याची स्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केली. अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या पाणी टंचाई संदर्भातील अडी अडचणी समजून घेत काही सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील बैठकीस हजर असणाऱ्या सरपंचांच्या अडचणी जिल्हाधिकारी यांनी ऐकून घेतल्या. भूम तालुक्यात 74 ग्राम पंचायती व 96 गावे आहेत. तालुक्यात सध्या वालवड 4, आंबी 2, गिरवली 2, हिवर्डा 2, पाटसांगवी 2 व सामनगाव, दांडेगाव, वाल्हा, लांजेश्वर, गोलेगाव पारधी वस्ती, गोरमाळा,अंतरंगाव या 12 गावात 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी 16 अधिग्रहणे आहेत.  तालुक्यामध्ये ज्या गावांना पाण्याचा स्त्रोत नाही त्या गावांना विहीर, बोर अधिकरण करून किंवा टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले. 

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही नियोजन करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. टँकरच्या खेपा मोजण्यामध्ये अफरातफरी होऊ नये यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. प्रत्येक टँकरला जीपीएस प्रणाली जोडण्यात आलेली आहे. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून टँकर मॉनिटरिंग ॲप वापरून टँकरच्या खेपा मोजण्यात येणार आहेत.  तालुक्यामध्ये सध्या ज्या ज्या ठिकाणी पाणी साठा उपलब्ध आहे तो पाणीसाठा फक्त पिण्यासाठीच वापरण्यात यावा जर त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होत असेल तर तेथील मोटर तात्काळ जप्त कराव्यात असे आदेश ही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये दिले. तालुक्यामध्ये जलजीवनची कामे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. ती पूर्ण करून घ्यावीत असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


 
Top