धाराशिव (प्रतिनिधी)- 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गाची घोषणा झाली होती. परंतु 2014 ते 2019 पर्यंत या संदर्भात कोणतेही प्रक्रिया झाली नाही. 2019 ला मी ज्या वेळेस खासदार झालो, त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेवून काम मार्गी लावले. कामाचे टेंडर निघाले. मी घेतलेल्या बैठकीमुळेच या रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली असे मत विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. 

या पत्रकार परिषदेमध्ये आमदार कैलास पाटील, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अशोक जगदाळे, मसुद शेख आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना ओम राजेनिंबाळकर यांनी रेल्वे विभाग राज्य सरकारकडे येते का केंद्र सरकारकडे येते? असा प्रश्न उपस्थित करून कोणीही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची सवय राणा पाटील यांना आहे. त्यातून त्यांची बौधिक दिवाळीखोरी दिसून येत आहे. यावेळी ओम राजेनिंबाळकर यांनी रॅलीला 500 रूपये देवून जमा केल्याची तक्रार आपण दिली असून, हे सरळ आचार संहिता भंग आहे असे सांगितले. मोफत उपचाराच्या दाव्या संदर्भात माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली त्यानुसार तेरणा मेडिकल कॉलेजला सरकारने 18 कोटी 23 लाख 71 हजार 248 रूपये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दिले आहेत. असे असताना मोफत उपचार केले असे जाहीर कशाला सांगता असा प्रश्न उपस्थित केला. 


नेरूळला का मेडिकल कॉलेज मागितले

ज्यावेळेस राज्य सरकारकडे मेडिकल कॉलेज संदर्भात प्रस्ताव देण्यात आला त्यावेळी नेरूळसाठी प्रस्ताव का दिला? असा प्रश्न उपस्थित करून तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या उद्देशामध्ये ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देणे, शेतकऱ्यांची उन्नती साधणे असे असताना मेडिकल कॉलेज नेरूळसाठी मंजूर करून घेतले. असे ओम राजेनिंबाळकर यांनी सांगितले. तेरणा ट्रस्टवर संचालक म्हणून पूर्वी तेरणा साखर कारखान्याचे संचालक मंडळच संचालक होते. परंतु त्यानंतर एकाच कुटुंबातील सदस्य अजीवन सदस्य करून घेतले आहेत असेही त्यांनी सांगितले.  यावेळी लोकसभेत आपण मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण विविध प्रश्न आपण मांडले. आपल्याला प्रतिष्ठेसाठी खासदार व्हायचे नाही तर लोकांच्या प्रश्न मांडण्यासाठी खासदार व्हायचे असा दावाही राजेनिंबाळकर यांनी केला. 


 
Top