धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीची कामे पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे.विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले.
दि. 16 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ.ओंबासे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष व उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.ओंबासे म्हणाले, निवडणुकीच्या काळात कुठे आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्याबाबतची तक्रार सी-व्हिजिल ॲपवर नोंदविता येते.अडतदारला 2 लक्ष रुपये, रिटेलरला 1 लक्ष रुपये आणि सामान्य नागरिकाला 20 हजार रुपये रोख रक्कम सोबत घेऊन जाता येते,मात्र या रक्कमेची कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे.