धाराशिव (प्रतिनिधी)- सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त वतीने आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सव 2024 धाराशिव या कार्यक्रमांतर्गत श्री.तुळजाभवानी क्रीडा संकूल येथे 3 मार्च रोजी दुपारी 4 वाजता शशिकांत माने व त्यांच्या संचाने भीमगीताचे सादरीकरण केले. त्यानंतर प्रा.डॉ.सतिश चव्हाण यांनी शिवचरित्रावर व्याख्यान दिले. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना शिवचरित्राची प्रत्यक्षात जणू अनुभूती अनुभवयास मिळाली.त्यानंतर लगेच महाराष्ट्राची परंपरा असलेला मर्दानी खेळाचा आविष्कार संजिवनी इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित प्रेक्षकांसमोर उत्कृष्टपणे सादर केला. 

आनंद समुद्रे व संघाने सादर केलेल्या शास्त्रीय गायनात धाराशिवकर मंत्रमुग्ध झाले.तसेच साहित्यिक युवराज नळे यांनी गझल मुशायराचा कार्यक्रम सादर केला.या गझल मुशायरा कार्यक्रमात सादर झालेल्या प्रत्येक शेर व गझल यास प्रेक्षकांनी तोंडभरून टाळ्यासह दाद दिली. 

यानंतर प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे “चला हवा येऊ द्या“ या हास्य विनोदी कार्यक्रमाची.भारत गणेशपुरे,श्रेया बुगडे,कुशल बद्रिके व त्यांच्या सहकलावंतांनी उपस्थित प्रेक्षकांना आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हसण्यास भाग पाडले.क्रीडा संकुलावर एकच हास्यकल्लोळ पिकला.चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील शाळाने तर सर्व प्रेक्षक लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरीक खदखदून हसत होते.


 
Top