भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात पवन चक्क्याच्या वाढत्या दादागिरीमुळे भूम परिसर व तालुक्यात गावठी कट्ट्यासह काही युवक फिरत आहेत. पवन चक्की चालक व शेतकरी यांच्यातील भांडणातून गावठी कट्ट्यासह युवक फिरत असल्यामुळे भितीचे वातावरण परसले आहे. अशा एका युवकास तालुक्यातील सुकटा येथे लोकांनी पकडून भूम पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, भूम पोलीस स्टेशन मध्ये सुकटा येथील पोलीस पाटील अमोल उद्धव आठवले यांनी फोन करून अशी माहिती दिली की, शासकीय दुध डेअरी समोर युवक मोठ्या मोठ्याने मोघम ओरडत आहे. गावातील लोक मारहाण करत आहेत. मारताना त्याच्या कमरेला असलेला गावठी कट्टा खाली पडलेला आहे.  लोकांनी त्याला धरून ठेवलेले असून तुम्ही तात्काळ सुकटा येथे या अशी माहिती दिली. त्यावरून भूम पोलीस स्टेशनचे पोलीस नायक मनोज देवकर व इतर सहकारी सुकटा गावी पोहोचलो. त्यावेळी काही जणांनी त्या युवकाला पकडून ठेवले होते. त्यानंतर त्या युवकास चौकशी केली असता त्याचे नाव तुषार विक्रांत हुंबे (वय 22 रा. घाटनांदुर, हल्ली मुक्काम समर्थ नगर भूम) व मयूर रंगनाथ पवार राहणार घाटनांदुर असे सांगितले. त्यांना सुकटा येथे येण्याचे कारण विचारले असता आम्हाला काही लोकांनी भांडण मिटवण्यासाठी बोलवले होते. पण येथे आल्यानंतर आम्हाला मारहाण सुरू करण्यात आली असे त्यांनी सांगितले. सध्या पवन चक्क्यामुळे ईट व सुकटा परिसरात गँगवॉर सुरू झाल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. पोलीस प्रशासनाने अशा भाईगिरी करणाऱ्या गुंडांची आता दहशत संपवण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू करणे गरजेचे आहे. गावठी कट्टे हे सध्या भूम तालुक्यात पुणे - मुंबईहून आलेल्या गुंडाकडे सर्रास पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन याबाबतीत वेळीच आळा घालणार आहे का ? का या दहशतीतून एखादी मोठी घटना होण्याची वाट तर प्रशासन पाहत नाही ना? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. या घटनेत उमेश महादेव देवकर  पो. ना. यांच्या फिर्यादीवरून तुषार विक्रांत हुंबे याच्यावर 3/25 शस्त्र अधिनियम 1995 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.


 
Top