धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याचा जागतिक दर्जाच्या पर्यटन दृष्टीने नैसर्गिक धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी अशी मागणी पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने आज धाराशिव येथे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समन्वयाने झालेल्या या भेटी दरम्यान पर्यटन जनजागृती संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव येथे विमानतळावर पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पर्यटन जनजागृती संस्थेचे सचिव देविदास पाठक,  गणेश वाघमारे, बाबा गुळीग उपस्थित होते.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून जिल्हा बाहेर पडण्यासाठी, जिल्ह्याचा उत्पन्न निर्देशांक वाढवण्यासाठी पर्यटन व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी हातलाई धाराशिव लेणी टुरिझम कॉरिडॉर,तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर परिसर आणि रामदरा तलाव परिसरात पर्यटनाच्या सुविधा वाढवणे ,धाराशिव जिल्ह्यात असलेल्या जैन धर्मियांच्या कुंथलगिरी, काटी सावरगाव, तेर या तीर्थक्षेत्रांना जोडणारा जैन टुरिझम सर्किट विकसित करणे,धाराशिव जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंग शिवदर्शन सर्किट विकसित करणे,धाराशिव तालुक्यातील तेर येथील ऐतिहासिक पुरातत्त्व धार्मिक स्थळांचा पर्यटन दृष्ट्या विकास,परंडा तालुक्यातील डोमगाव येथील कल्याण स्वामी समाधी मंदिर नळदुर्ग आणि परंडा येथील भुईकोट किल्ले यांचा विकास आराखड्यात समावेश करावा. अशी मागणी या निवेदनाद्वारे पर्यटनमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे लोकसभा संयोजक नितीन काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, विद्याताई माने, प्रवीण शिरसाठे आदी मान्यवर उपस्थित होते. 
Top