तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीचे वारे जोर पकडत असताना आता इच्छुकांनी देवदेवतांच्या चरणी दर्शनासाठी हजेरी लावण्यास प्रारंभ केला आहे. विविध पक्षाची उमेदवारी मिळालेले तसेच इच्छुक श्रीतुळजाभवानी दारी दाखल होत असून, लोकसभेसाठी इच्छुकांची श्रीतुळजाभवानी चरणी मांदीयाळी पहावयास मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी पारनेरचे आमदार व अहमदनगर (अहिल्यादेवीनगर) लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या निलेश लंके यांनी आपल्या समर्थकांसह श्रीतुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या पूजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारीक पुजारी प्रविण कदम यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, अमोल कुतवळ यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यापाठोपाठ रावेर मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना 2024 ची लोकसभा उमेदवारी जाहीर होताच त्यांनीही शुक्रवारी (दि. 15) तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन

घेतले. कांही दिवसांपूर्वीच  रामप्रसाद बोर्डीकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबीयांनीही श्रीतुळजाभवानी देवीचरणी पूजा करून आशीर्वाद घेतले होते.

तसेच इच्छुकांचे आईवडील, बहीण, भाऊ, जवळचे मिञ, नातेवाईक ही मोठ्या संख्येने श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येत आहेत.


 
Top