धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी घोषित केल्याने 40 - उस्मानाबाद लोकसभा क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची निवडणूक विषयक कामे पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.नोडल अधिकाऱ्यांवर निवडणुकीची सोपविलेली जबाबदारी त्यांनी अत्यंत दक्षतेने व चोखपणे पार पाडावी.असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले.

16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव व उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.ओंबासे म्हणाले,लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तहसीलदार,गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लावलेली राजकीय पक्षांचे झेंडे, जाहिरातीचे फ्लेक्स व बॅनर तात्काळ काढून घ्यावे.यासाठी भरारी पतके गठीत करून या कामाला प्राधान्य द्यावे.केलेल्या कामाचा अहवाल तात्काळ सादर करावा.उद्घाटन व भूमिपूजनाच्या कोनशीला झाकून घ्याव्यात.विविध विभागांच्या संकेतस्थळावर कोणतेही राजकीय नेत्यांचे फोटो नसावे.रुग्णवाहिकांवर असलेली नावे झाकून टाकावीत. घरांवर झेंडे व जाहिराती लावण्यात आल्या असतील तर त्या काढून घ्याव्यात. वीज वितरण कंपनीच्या खांबावर लावलेले राजकीय जाहिरातींचे फलक काढून टाकावेत. ज्या कामांचे कार्यादेश दिले असतील ती कामे सुरू ठेवावीत. पाणीटंचाई निवारणाची कामे सुरू राहतील असे डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले. 


 
Top