धाराशिव (प्रतिनिधी)-चोराखळी येथील देवस्थान गट क्रमांक 639/1 मधील मुरूम रॉयल्टी न भरून घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी व तलाठी यांना कारवाई न करण्याबाबत सांगण्यासाठी कळंब तालुक्यातील येरमाळा सर्कलचे मंडळ अधिकारी देवानंद मरगु कांबळे यांने 4 हजार रूपयाची लाच मागितली होती. या लाचेची पडताळणी केल्यानंतर 28 मार्च 2024 रोजी प्रत्यक्ष लाच कांबळे यांनी स्विकारली. लाच स्विकारताच कांबळे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली असून, धाराशिव शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोराखळी येथील देवस्थानच्या जमिनीतील 50 ब्रास मुरूम रॉयल्टी भरून न घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी व संबंधित तलाठी यांना कारवाई न करण्याबाबत सांगण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष 4 हजार रूपयाची मागणी केली. सदर लाचेची रक्कम गुरूवार दि. 28 मार्च रोजी देवानंद कांबळे यांनी स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विकास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके यांनी ही कारवाई केली. 


 
Top