धाराशिव (प्रतिनिधी)-नागपूर येथील यशवंत मनोहर प्रतिष्ठानच्यावतीने भाग्यश्री केसकर यांच्या ‌‘उन्हानं बांधलं सावलीचं घर' या कवितासंग्रहास कवीसूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले आहे. दहा हजार रूपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या महान मानवी मूल्याच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी धडपडणारा कवितासंग्रह म्हणून पुस्तकाची दखल घेत या महत्वपूर्ण पुरस्काराने केसकर यांचा गौरव करण्यात आला आहे.

नागपूर येथील बजाज भवन परिसरातील करूणा भवन सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी भन्ते सुरई ससायी यांच्या अध्यक्षतेखाली कवीसूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. ताराचंद खांडेकर, संपादक श्रीकांत अपराजित, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. पुष्पलता मनोहर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याच कार्यक्रमात डॉ. मनोहर यांचा 81 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कवीचा खरा शब्दच जगात पेटलेला वणवा विझवेल, असा आशावाद डॉ. यशवंत मनोहर यांनी यावेळी व्यक्त केला. संविधानाने जे जे नाकारले, ते प्राप्त काळात आपण स्वीकारत सुटलो आहोत काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी अशोक नामदेव पळवेकर यांच्या ‌‘असहमतीचे रंग', प्रशांत वंजारे यांच्या ‌‘आम्ही युध्दखोर आहोत' आणि भाग्यश्री केसकर यांच्या 'उन्हानं बांधलं सावलीचं घर' या तिन्ही काव्यसंग्रहांना कवीसूर्य यशवंत मनोहर पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 10 हजार रूपये रोख सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. राज्यभरातील 81 कवींनी लिहिलेल्या आणि डॉ. प्रकाश राठोड यांनी संपादीत केलेल्या ‌‘पर्यायाचे पडघम' या संपादीत काव्यसंग्रहाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. केसकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक केले जात आहे.

 


 
Top