भूम (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नवनिर्मितीस चालना देण्याचे काम शाळेने केले पाहिजे. आष्टा शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले सृजन हे हस्तलिखित याचे मुर्तीमंत प्रतिक आहे असे प्रतिपादन टकले यांनी केले.

भूम तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टा येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सृजन हस्तलिखिताचे प्रकाशन विस्तार अधिकारी सोमनाथ टकले यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील तर प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी सोमनाथ टकले हे होते. 

विद्यार्थी हस्तलिखितात मराठी विभाग, विज्ञान विभाग, इंग्रजी विभाग,माझे चित्र,बातम्यातुन व छायाचित्रातुन असे विविध विभाग यात करण्यात आले आहेत. मराठी विभागात निबंध, कविता, गोष्टी,कोडी इत्यादींबाबत लिखाण केले आहे.विज्ञान विभागात शास्त्रज्ञाविषयी माहीती,कोडी, विज्ञानविषयक लेख तसेच इंग्रजी विभागात निबंध,कविता,लेख यांची रेलचेल आहे.माझं चित्र या सदरात विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, डिझाईन, विविध प्रकारचे नक्षीकाम यांचा समावेश आहे.

हस्तलिखिताचे संपादन राधिका नलवडे, सहसंपादक आर्या पाटील,अक्षरा सराफ यांनी केले आहे. संपादक मंडळात वैष्णवी बनसोडे,करुणा चव्हाण, प्रद्युम्न कदम,अक्षरा बनसोडे, सुप्रिया बनसोडे यांचा समावेश आहे. तर मुखपृष्ठ अशोक गवळी याने उत्कृष्ट रित्या तयार केले आहे. हस्तलिखित तयार करण्यास शाळेचे मुख्याध्यापक जवाहर भोसले, सहशिक्षक संजिवन तांबे,अशोक नलवडे, विठ्ठल सारुक, विजयालक्ष्मी उपळकर,अनिता नाईकवाडी व पुतळा पवार यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव कातुरे यांनी केले.


 
Top