उमरगा (प्रतिनिधी)-राज्याचे आरोग्यमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला आहे. विंधन विहिरीला पाणी येत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. दरम्यान रुग्णालयात खाजगी टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तोही अपूरा पडत असून, यावर तात्काळ प्रभावी उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.

उमरगा हे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागांतील तालुक्याचे ठिकाण तसेच राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे 100 खाटांच्या सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय व स्वतंत्र ट्रामा केअरची उभारणी करण्यात आली आहे. परिसरातील तीस ते चाळीस गावासह कर्नाटकातील ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येथे अपघात, विविध आजाराचे रुग्ण, वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण व नातेवाईक येत असतात. सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय  हे गरिब व सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना सोयीचे वाटत असले तरी येथे गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. रूग्णालयातील विंधन विहीर पाण्याअभावी बंद पडली आहे, पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले असून याचा फटका कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, रुग्ण व नातेवाईकांना बसू लागला आहे. रूग्णालयात पाणी नसल्याने रूग्ण व नातेवाईकांना पाणी खरेदी करावे लागत आहे. पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शौचालयाचा वापर बंद पडला आहे. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांना उघड्यावर शौचाला जावे लागते आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात रुग्णांची स्वच्छता आणि आरोग्य धोक्यात येवून शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण होवू शकतो होतो. उपजिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई ही केवळ एक तात्पुरती समस्या नाही, तर ती एक गंभीर आणि दीर्घकालीन समस्या आहे. या समस्येवर तातडीने आणि प्रभावीपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.


लोकप्रतिनिधीचा पुढाकार गरजेचा!

राज्याचे आरोग्यमंत्री धाराशिवचे पालकमंत्री असलेल्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार मोफत असले तरी गेल्या महिन्या पासून येथे येणाऱ्या रुग्नाला पाणी खरेदी खर्चाचा नाहक भुर्दंड सोसावा करावा लागत आहे. रुग्णालयातील पाणी टंचाई सुधारण्यासाठी पालिकेच्या नळासोबत जलकुंभाची स्वतंत्र जलवाहिनी जोडणी केल्यास यावर मात करता येवू शकते, यासाठी आरोग्यमंत्री व लोकप्रतिनिधीने पुढाकार घेण्याची खरी गरज आहे.


रुग्णालयात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विंधन विहीर व नगर पालिकेची नळ जोडणी आहे. यापैकी एक विंधन विहिर तीन दिवसांपासून पाण्या अभावी बंद पडली आहे, दुसरी विंधन विहीर शेवटच्या घटका मोजत आहे, नगर पालिकेकडून गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा करण्यात आला नाही, त्यामुळे दररोज पैसे खर्चून टँकरने रुग्ण व नातेवाईकांची तहान भागवली जात आहे. कधी टॅकरला उशीर  झाल्यास रुग्णाला बाहेरून पाणी खरेदी करावे लागते आहे. तर काहीवर घरातूनच पाणी आणण्याची वेळ आली आहे.


रुग्णालयातील पाण्याची स्त्रोत बंद पडली आहेत. याची वरिष्ठांना माहिती दिली आहे. पालिकेकडून महिन्यापासून पाणी सोडण्यात आले नाही, त्यामुळे दररोज खासगी चार टॅकरने 15 हजार लिटर पाणी खरेदी करावे लागते आहे.- (डॉ विनोद जाधव, वैद्यकिय अधिक्षक)


 
Top