धाराशिव (प्रतिनिधी)-आधुनिक भारतामध्ये तेरची वेगळी ओळख निर्माण करत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वंकश विकास आराखडा तयार करण्यात आला असून प्राचीन वारसा स्थळांना नवीन झळाळी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जागतिक स्तरावर तेरचे नाव पोहोचविण्यासाठी नियोजन बध्द काम सुरू असून येथे वैभव, समृध्दी, रोजगार यावा व येथील वैभवशाली इतिहास जगासमोर मांडता यावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका मंदीर व परिसरातील विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी बोलताना केले.

तेर ता. धाराशिव येथील मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यासह प्रयत्नांतून तेर येथील श्री संत गोरोबा काकांच्या मंदिर व परिसराच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व पर्यटन विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सब स्टेशन ते गोरोबाकाका मंदिर रस्त्याचे रुंदीकरण करणे 9 कोटी रुपये, संत गोरोबाकाका तीर्थक्षेत्र परिसर सुधारणा यामध्ये प्रवेशद्वार, लाकडी मंडप व इतर कामांसाठी 6 कोटी 85 लाख रुपये, भक्तनिवास उर्वरित बांधकाम करणे 2 कोटी 15 लाख रुपये, पुरातत्व विभागाकडून गोरोबाकाका मंदिर परिसर जन सुविधा केंद्राचे बांधकाम करणे 1 कोटी 17 लाख रुपये. यासह तीर्थकुंड, त्रिविक्रम मंदिर, चैत्यगृह, कोट टेकडी या स्मारकांच्या जतन व संवर्धनासाठी जवळपास रु. 23 कोटी असे एकूण रु 43 कोटीहून अधिकचा निधी देण्यात आला आहे. यांचे भूमीपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  

याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, पद्माकर फंड, शिवाजीराव नाईकवाडी, निहाल काझी, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top