भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील गोलेगाव फाटा पारधी पिढी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसले बाबतचे निवेदन माजी सरपंच रुक्मिणी शिवाजी काळे यांनी गटविकास अधिकारी यांना दि.20 मार्च रोजी दिले होते. ग्रामसेवक व पंचायत समिती मधील अधिकारी यांना वेळोवळी भेटून विनंती करून पाण्याबाबतचा प्रश्न त्यांनी मांडला असल्याचे त्यात म्हंटले होते. पाण्याच्या बाबतीत ठोस उपाययोजना न केल्यास दि.22 मार्च रोजी पारधी वस्तीवरील सर्व नागरिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला होता. त्याप्रमाणे दि.22 मार्च रोजी पारधी वस्ती गोलेगाव फाटा येथील नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवर उपोषण सुरू केले. 

त्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी संतोष नागटीळक यांनी शिष्टमंडळाची भेट घेत तात्पुरत्या स्वरूपात टँकरची व्यवस्था करून शासकीय पातळीवर तात्काळ प्रश्न उपस्थित करून कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित नागरिकांनी उपोषण मागे घेत  लवकरात लवकर पाण्याची सोय न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला.


 
Top