भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील माणकेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातत्व महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने 11 कोटी 57 लाख 92 हजार 768 रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून मंदिरा तील पुरातत्वीय शास्त्र संकेतानुसार कामे होणार आहेत. यामध्ये रासायनिक जतन काम,जोता मजबुतीकरण,गळती प्रतीबंधक उपाययोजना,सायंटीफिक उत्खनन, स्मारकाची रम्यता जतन करणे,पुरावशेष यांचे जतन करणे,तुटलेले भाग बदलणे,साईट डेव्हलपमेंट ,दगड़ी पदपथ तयार करणे, प्रकाश योजना करणे,इतर अनुषांगिक कामे करण्यात येणार असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
तालुक्यातील माणकेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातत्व शिव मंदिराला राज्य संरक्षण स्मारक म्हणून दर्जा देण्यात आला आहे. माणकेश्वर येथील महादेव मंदिर उत्तर चालुक्य काळातील आहे. या महादेव मंदिराच्या चोही बाजूने 400 पेक्षा अधिक देवी देवतांच्या मूर्ती आहेत. यामध्ये विष्णू शिव सरस्वती भैरव ब्रह्मा सुरसुंदरी महाकाव्यातील प्रसंग नर्तक नर्तिका गज पत्र लेखिका अश्वांचा अशा प्रकारच्या विविध मूर्ती पाहावयास मिळतात. मंदिराच्या समोरच्या बाजूस नंदी मंडप आहे. या मंदिराच्या विकास कामासाठी शासनाच्या वतीने अकरा कोटी 57 लाख 92 हजार 768 इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मंदिराची माहिती दर्शवणारे फलक व महात्मा सांगणारे फलक बसवण्यात येणार आहेत.