उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यात सध्या तापमान वाढले आहे. सध्या तापमान 37 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. किमान तापमान 20 अंश सेल्सिअसवर आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची तर हवेतील धूळ, धूर, मातीचे बारीक कण आणि उन्हामुळे डोळ्यांच्या त्रासात वाढ होण्याची शक्यता असते. अशा पार्श्वभूमीवर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

उमरगा शहर व ग्रामीण भागात यावर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्याची चाहुल लागली. मार्च महीन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात सरासरी तापमान 37 अंश सेल्सिअस आहे. वरचेवर उन्हाचा कडाका वाढतच आहे. उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरिरातील तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढल्यानंतर महत्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन त्यांचे कार्य बिघडते. त्यास उष्माघात असे म्हणतात. याचे उन्हाळयात सर्वात जास्त प्रमाण असते. उष्माघातामुळे रुग्णांचा मृत्यूही संभवतो. तर उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा परिणाम शरीरा बरोबरच प्रखर सुर्य किरणांमुळे डोळ्यावर पांढरा पडदा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांच्या लहान सहान तक्रारी कडे दुर्लक्ष व घरगुती उपाय न करता तात्काळ तज्ञांकडे नेत्र तपासणी करून त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.


डोळ्यांची घ्यावयाची काळजी!

भरपूर पाणी पिणे, सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या, घराबाहेर पडताना चांगल्या काचेचे गॉगल आणि टोपीचा वापर करावा, सतत स्वच्छ व थंड पाण्याने डोळे धुवावेत, महिलांनी चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधने वापरताना डोळ्यात जाणार याची काळजी घ्यावी, रस्त्यावरील फॅशनेबल गॉगल्सचा वापर टाळावा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'आय ड्रॉप' चा वापर करावा.


उन्हाळा सुरु झाला असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे लोकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. सुती आणि हलके कपडे घालावेत, घरात थंड हवा राखण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवावे, तीव्र उन्हामध्ये जाणे टाळावे, फलाहार, उसाचा रस, लिंबू पाणी, ताक व जास्ती जास्त पाणी प्यावे. शरीरात पाण्याची पातळी समतोल राहून उष्माघाताचा त्रास होणार नाही.- (डॉ विजय बेडदुर्गे, श्वसनविकार तज्ञ, उमरगा)


उन्हामध्ये घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल, स्कार्प वापरणे, प्रखर सुर्य किरणांपासून संरक्षण करणारे डोळ्यांजवळ व्यवस्थित बसणारे सनग्लास वापरावेत. तज्ञांनी दिलेल्या औषधांबरोबरच सतत डोळे थंड पाण्याने धुणे, दररोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, पपई, गाजर, दूध तसेच रसाळ फळाचा वापर करावा.-( डॉ दत्तात्रय खलंगरे, नेत्ररोग तज्ञ, उमरगा)


 
Top