धाराशिव (प्रतिनिधी)- करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते  प्रभुशी तयांचे' हे ब्रीदवाक्य घेऊन छोट्या छोट्या मुलांना संस्कारक्षम बनवणारी धाराशिवचे मुक्तांगण प्रायमरी स्कूल. नुकतेच या शाळेचे स्नेहसंमेलन अतिशय थाटात संपन्न झाले.

नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनियर केजी व प्रायमरी विभागाच्या मुलांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. यामध्ये देशभक्तीपर गीत, कोळी गीत, खंडोबाचे गीत, पंजाबी भांगडा, राजस्थानी नृत्य आदि नृत्यांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने करण्यात आली. कै. बी. आर. नलावडे यांच्या प्रतिमेचे पूजन सन्माननीय अतिथी शेषाद्री डांगे व शर्मिष्ठा डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुक्तांगण प्रायमरी स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष कमलताई नलावडे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत नलावडे, सचिव मंजुषा नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुक्तांगण शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी शहरांमध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये प्रामुख्याने ओसला ग्रुप,अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, राष्ट्रसेविका समिती, रोटरी ग्रुप, फेडरेशनच्या पदाधिकारी यांना विशेष निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. तसेच मुक्तांगणच्या सर्व स्टाफचे ही स्नेहसंमेलना निमित्त  विद्यार्थ्याकडून करून घेतलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांचाही प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता काळे यांनी केले .त्यांनी वर्षभरात घडलेल्या सर्व  घडामोडींचा आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना कमलताई  नलावडे म्हणाल्या की, गेल्या 24 /25 वर्षापासून केवळ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा ध्यास घेऊन शाळेची वाटचाल सुरू असून पालकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. इतक्या लहान वयातील मुलांचा कौशल्य पूर्ण विकास करणे अवघड असूनही आमच्या शाळेतील सर्व स्टाफ प्रामाणिकपणे यासाठी सतत प्रयत्नशील आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. या स्नेहसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.सुनिता गुंजाळ- कवडे यांनी केले. मुक्तांगण शाळेच्या वतीने यावेळी डॉ.रेखा ढगे, प्रा. विद्या देशमुख, स्नेहलता झरकर -अंदुरे, नीता कठारे, उज्वला मसलेकर, किरण देशमाने, सुप्रिया दूधभाते यांचा सन्मान करण्यात आला. या सर्व उपस्थित मान्यवरांनी लहान मुलांचे कौतुक करून त्यांना खाऊ साठी रोख स्वरूपात बक्षीस दिले. या स्नेहसंमेलनासाठी पालकांची विशेष उपस्थिती होती.


 
Top