धाराशिव (प्रतिनिधी)-आपण जीवनामध्ये यशस्वी झाला मोठ्या पदावर गेलेले आहात. याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु पदापेक्षा देखील महाविद्यालयात शिकत असताना अप्रत्यक्षरीत्या बापूजींनी  आपल्यावर केलेले संस्कार हे पदापेक्षा मोठे आहेत. कारण बापूजींच्या संस्कारामुळेच आपण मोठ्या पदावर गेलेला आहात, उंचीवर गेलेला आहात असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना केले. 

धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी मराठवाड्यात रामकृष्ण परमहंस महाविद्यालय सुरू केले नसते तर आपण कोणत्या अवस्थेमध्ये असतो याची कल्पना देखील करवत नाही. म्हणून जीवनामध्ये शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे, आपणास शिकवणारे गुरुदेव कार्यकर्ते आणि आपले आई वडील यांना कधीच आपण विसरू नका असा सल्लाही यावेळी त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना  दिला.

दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत चालले आहेत. याबरोबरच महाविद्यालयाचा चेहरा मोहरा देखील बदलण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठी  नवीन संकल्पना आपल्याकडे असतील तर वेळोवेळी आपण  आम्हाला सुचवाल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी 2003 मध्ये शिकत असणारे मोठ्या  संख्येने विद्यार्थी आणि तत्कालीन अध्यापन करत असणारे प्रा. हंगरगेकर, प्रा.कुलकर्णी, प्रा.शेळके, प्रा. सोमवंशी, प्रा. खुणे,प्रा. लव्हें,प्रा. सौ गोंदकर इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री सचिन शिंदे यांनी केले,सूत्रसंचालन डॉ. डी.आर घोलकर यांनी केले तर आभार उमेश भोसले यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन शिंदे आणि समर्थ सिटी डेव्हलपर्स व बिल्डर कंपनी, गौरव बागल, प्रमोद उंबरे,अश्विनकुमार बग्गा, सुनील बागल, सारिका कुलकर्णी, ॲडवोकेट केतकी पाटील व अन्य विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील मोठ्या संख्येने गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top