धाराशिव (प्रतिनिधी)-खरीप 2022 मधील नुकसानीपोटी अनुज्ञेय भरपाई पासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळणे अपेक्षित असून सोमवारी कृषि आयुक्त कार्यालयाकडे जमा रक्कम विमा कंपनीच्या खात्यावर वर्ग होणे अभिप्रेत असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यामध्ये मोहा ता. कळंब, पाडोळी (आ) ता. धाराशिव सलगरा (दि.) व सावरगाव ता.  तुळजापूर तर अनाळा व सोनारी ता. परंडा या महसूल मंडळांचा समावेश आहे.

शासन मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ देत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2022 मधील नुकसानी पोटी चुकीच्या पद्धतीने 50 % भारांकन लावून नुकसान भरपाई वितरित केली होती, मात्र शासन व प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर उर्वरित 50 % टक्के रक्कम वितरित करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शविली व एकूण अनुज्ञेय रु. 282 कोटी मधील जवळपास रु. 230 कोटी वितरितही केले. शासनासोबत झालेल्या कराराप्रमाणे जमा विमा हप्त्याच्या रकमेपेक्षा भरपाई ची रक्कम 110 % हून अधिकची असल्याने विमा कंपनीला काही रक्कम शासनाकडून येणे बाकी होती. सदरील रक्कम प्राप्त होताच उर्वरित रुपये 50 कोटी वितरण करण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे. या रकमेचा शासन निर्णय निर्गमित होवून रक्कम कृषी आयुक्तांकडे जमा झाली आहे. सोमवारी सदरील रक्कम विमा कंपनीच्या खात्यात वर्ग होणे अपेक्षित असून पुढील एक ते दोन दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी प्रयत्न राहणार आहे.

सन 2020 व 2021 मधील उर्वरित पीक विम्यासाठी न्यायालयीन लढा सुरू असून मार्च 20 व 21 रोजी मा. उच्च न्यायालयात पुढील सुनावणी आहे.  दुष्काळी परिस्थित शेतकऱ्यांना दिलासा देण्या साठी व विषयात नियोजनबद्ध पाठपुरावा चालू आहे. 
Top