धाराशिव (प्रतिनिधी)-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने महिला सशक्तीकरण अंतर्गत आणि महिलांचा गुंतवणूकीत सहभाग वाढविण्यासाठी 'महिला सन्मान बचत पत्र' (व्याजदर 7.50 टक्के) नवीन बचत योजना धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसमार्फत सुरु केली आहे. तसेच मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी 'सुकन्या समृध्दी योजना' (व्याजदर 8.20 टक्के) सुरु केली आहे. या दोन्ही योजनांची जनजागृती करण्यासाठी अधीक्षक डाकघर धाराशिव विभाग, मुख्यालय लातूर यांच्याकडून 1 ते 8 मार्च, 2024 या कालावधीमध्ये संपूर्ण धाराशिव जिल्हातंर्गत सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विशेष जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत संपूर्ण योजनेची माहिती देणे, घरोघरी पोस्ट ऑफिस योजना पोहोचविणे, पात्र लाभार्थी यांचे तात्काळ नवीन खाते उघडणे इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील सर्व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या सर्व पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करावा तसेच धाराशिव येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये आधार कार्ड नवीन काढण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन धाराशिव विभाग, मुख्यालय लातूरचे अधीक्षक संजय अंबेकर, धाराशिव उपविभागचे उप अधीक्षक श्रीकांत माने आणि  धाराशिवच्या पोस्ट मास्तर श्रीमती छाया बारगजे यांनी केले आहे.


 
Top