धाराशिव  (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्य घटनेचे कलम 324 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन ही निवडणूक विना अडथळा व शांततेने पार पाडण्यासाठी निवडणूकीच्या काळात लाऊड स्पीकर वापरण्यावर आयोगाने प्रतिबंध केला आहे. 

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांची रितसर परवानगी घेऊन करता येईल. असा वापर करत असतांना वाहन चालू ठेवून ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकाच्या वापरास वाहनांवर बसवून किंवा अन्य प्रकारे दररोज सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी/निवडणूकीचे उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर वाहनांवर बसवून किंवा प्रचार करणाऱ्या लोकांनी ध्वनीक्षेपकांच्या वापराची परवानगी विवरण मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलिस स्टेशनला देणे बंधनकारक राहील.

या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हा बंदी आदेश जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघाचे हद्दीत 6 जूनपर्यंत अंमलात राहील. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.


 
Top